आता थांबायचं नाय!

मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक यांचं नातं म्हणजे आधी कोंबडी की आधी अंडं असं आहे. प्रेक्षक म्हणतात की, चांगले चित्रपट येत नाहीत म्हणून आम्ही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जात नाही आणि ‘सृष्टी’वाले लोक म्हणतात की, चांगल्या चित्रपटांची निर्मिती करूनही प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाही म्हणून पर्यायाने अर्थकारणाचा डोलारा आम्हाला सांभाळता येत नाही. या विचित्र कात्रीत अडकलेल्या चित्रपटसृष्टीसाठी येता २०२५ चा उन्हाळा मात्र हे ‘मरगळ’ आलेलं वातावरण बदलण्याची धमक ठेवतोय असं चित्र आहे. या मे महिन्यात लागोपाठ दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होतायत. पहिला ‘आता थांबायचं नाय’ या नावाने १ मे रोजी प्रदर्शित होतोय. तर दुसरा ‘एप्रिल – मे ९९’ या नावाने १६ मे रोजी प्रदर्शित होतोय. या दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहेत आणि यानिमित्ताने मराठी प्रेक्षकांना दोन उत्तम चित्रपट पाहायला मिळतील अशी आशा आहे. हे दोन्ही चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ असं म्हणत मराठी चित्रपटसृष्टीला पुढे कुठल्या दिशेने घेऊन जातात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
_______________________________________________

कुठल्याही चित्रपटाचं यश किंवा अपयश हे केवळ ‘बॉक्स ऑफिस’ कलेक्शनवर अवलंबून नसलं तरीसुद्धा चित्रपटाला चित्रपटगृहात लोकाश्रय मिळाला आहे का हा मापदंड एख्याद्या चित्रपटाचं यश अपयश मोजण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे ‘बॉक्स ऑफिस’ कलेक्शनचा मुद्दा पूर्णपणे कधीच बाद ठरवता येत नाही. गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची संख्या आणि त्यातून यशस्वी झालेल्या चित्रपटांची संख्या याचं गणित मांडायला गेलं तर ते प्रचंड व्यस्त आहे. अशा अत्यंत नाजूक वळणावर मराठी चित्रपट सृष्टी उभी असताना ‘आता थांबायचं नाय’ आणि ‘एप्रिल मे ९९’ या दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरने एक आशेचा किरण निर्माण केला आहे. चित्रपट नक्की कसा आहे हे प्रत्यक्ष चित्रपट बघितल्यानंतरच कळू शकेल पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसं या चित्रपटांच्या ट्रेलरवरून दोन चांगले चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या वाट्याला येतील अशी आशा आहे.
१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटात मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कामगारांचा अशिक्षित ते शिक्षित असा प्रेरणादाई प्रवास रेखाटण्यात आला आहे. ज्या वयात घर, मुलं -बाळं, नोकरी सांभाळत माणूस आयुष्य जगत असतो अशा वयात मागे पडलेले आपले शिक्षण पूर्ण करण्याची एक जबाबदारी कामगारांवर येते त्यांचा या काळातील प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या विषयात नाविन्य आहे. साथीला सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी यासारख्या अनेक तगड्या कलाकारांची फौज आहे आणि या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारा शिवराज वायचळ सारखा कलाकार आहे. यामुळे या चित्रपटाने सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत.
यापाठोपाठ १६ मे रोजी रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपटही प्रदर्शित होतोय. कोव्हीडनंतर आपण एक ट्रेंड पहिला तर सर्वांनाच ‘nostalgia’ च्या भुताने झपाटले आहे. त्यामुळे जुने चित्रपटच चित्रपटगृहात प्रदर्शित होतायत असं नाही तर नव्याने जुन्या चित्रपटांसह काळाच्या ओघात मागे पडलेल्या कलाकारांची त्यांच्या कलेचीही विशेष करून चर्चा होताना दिसतेय. हाच nostalgia चा germ घेऊन रोहन मापुस्कर याने सर्वांच्याच मनातल्या हळव्या कोपऱ्यात अलगद हात टाकायचा प्रयत्न केला आहे आणि तो कोपरा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या! ‘तुला माहितीय आमच्या वेळी आम्ही अमुक करायचो’ असं म्हंणणारी इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या आधीची पिढी या चित्रपटाशी instant connect होईल असा अंदाज आहे. त्यांच्या माध्यमातून मग पुढे त्यांची मुलंही या चित्रपटाशी जोडली जातील अशी खात्री वाटते.
एखादा चित्रपट चालो अथवा न चालो त्यावरून एखादी industry चालू राहील की बंद पडेल असं कधी होत नाही. त्यामुळे या दोन्ही आगामी चित्रपटांच्या यश-अपयशावर जरी मराठी चित्रपटसृष्टीचे जीवन – मरण अवलंबून नसले तरी या चित्रपटसृष्टीची दिशा मात्र हे दोन चित्रपट नक्कीच ठरवू शकतात यात काही शंका नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर आपली टिप्पणी नोंदवणाऱ्या सर्वच व्यासंगी प्रेक्षकांनी हे चित्रपट पाहून मग त्यावर व्यक्त व्हावे. कारण मग ते व्यक्त होणं अधिक समर्पक आणि थेट हृदयातून आलं असेल. येत्या उन्हाळ्यात हे दोन्ही चित्रपट उत्तम चालले तर ‘आता थांबायचं नाय’ असं म्हणत मराठी चित्रपट सृष्टीत यशाचे एक नवे पर्व सुरु होईल.
—————————————–
‘सैराट’ चालला बस्स..!
एकंदरीतच मराठी वर्गाकडे बघितलं तर आपल्याला जुन्या यशामध्ये वर्षानुवर्षे रमायला आवडते. कोणी सद्य स्थितीच्या मराठी चित्रपट विश्वाबद्दल अभ्यासूपणे, तटस्थपणे बोलू लागला की लोक त्याला सैराट, बाईपण भारी देवा, नटसम्राट, पावनखिंड या यशस्वी चित्रपटांची उदाहरणे द्यायला लागतात. हे सर्वच चित्रपट त्या त्या काळात ग्रेट होतेच. पण आता काळ बदलतो आहे, प्रेक्षक बदलतो आहे पण आजही आपण त्या १० वर्षांपूर्वीच्या सैराटच्याच यशात अडकलोय. आपण मराठी community म्हणून ज्यावेळी यातून बाहेर पडू तेंव्हा आजच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चांगल्या आशयाचे चित्रपटही ब्लॉकबस्टर होतील. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *